ओवीची weekend पार्टी

घररर्र घररर्र ……मॉर्निंग अलार्म वाजला अणि लगेच ओवीला जाग आली. मम्मी अगोदरच उठून टिफिनची तयारी करत होती. झटपट आवरून ओवी शाळेत जायला तयार झाली. शाळा,बॅडमिंटन मग भरतनाट्यम. तिचा पूर्ण दिनक्रम ठरलेला असतो. आणि हे सगळे ती मनापासून करते. ओवीचे वय फक्त ९ वर्षे. ह्या सगळ्यांसोबत तिला चित्रे काढायला आणि रंगवायला ही फार आवडते. नवीन नवीन रंगीबेरंगी चित्रे तिला फार आवडतात. तिचा अजून एक आवडता कार्यक्रम म्हणजे वीकएंडचा प्लॅन. तिच्या पप्पांसोबत ती हा प्लॅन ठरवत असे. कधी movie,कधी मॉल. संबंध आठवड्यामध्ये तिला ह्या प्लॅन ची खूप मज्जा वाटायची. ह्यावेळेस तिने आणि पप्पानी असाच वीकएंड प्लॅन बनवला होता. मूवी पहाण्याचा. त्यामुळे ओवी खूप खुश होती.असे असताना अचानक सकाळी आजोबांचा फोन आला आणि गावावरून बोलावणे आले. ओवीला हे कळताच तिचा मात्र खूप मूड ऑफ झाला. “ओह….नो …….. गावाला काय जायचे ….. मी तर तिथे फार काही जात नाही…आणि माझी कुणाशीच ओळख पण नाही…. कित्ती कित्त्ती बोअर ……” ओवीने मनात रंगवलेले वीकएंडचे स्वप्न पार धुळीस मिळाले.

दुसऱ्यादिवशी सकाळीच सर्व गावी जायला निघाले. डिसेंबर महिन्याचे दिवस. हवेत छान गारवा होता. त्यामुळे प्रवास सुखकर होता. काही तासात ओवी आपल्या गावी पोहोचली. गावाच्या वेशीवर केळीचे खांब आणि तोरण बांधले होते. ओवीला वाटलं आमचे वेलकम करण्यासाठी आहे हे सर्व. मग पप्पानी सांगितले, गावात कुणाकडेतरी लग्न असणार. म्हणून ही तयारी.

छोटेसे पण टुमदार घर तिची वाट पाहत होते. स्वयंपाकघर, देवघर, बैठकीची खोली, न्हाणीघर, अडगळीची खोली आणि अजून 2 मोठ्या खोल्या. वरती पोटमाळा. असे सुरेख घर. आजी आजोबा तर स्वागताला तयार होते. घरासमोर तुळशीवृंदावन, पुढे भले मोठे अंगण(त्यात अनेक प्रकारची रंगीत फुले लावली होती) आणि पाठीमागे त्याहून मोठे शिवार. त्यात आंबा,फणस,काजू,केळी,नारळच्या बागा. ओवी घरात न जाता घराला फेरफटका मारू लागली. तिला आजूबाजूला पाहताना बघून लगेच पप्पाही पुढे सरसावले.

“माझ्या लहानपणी आम्ही ह्या झाडाला दोरी बांधून झोके घ्यायचो.. ”  

“काआआय ?? झाडाला झोके??तुम्ही आपल्या गार्डन मध्ये आहेत तसे swing वर नाही खेळायचात?”  ओवी चा गोंडस प्रश्न.असे एक ना अनेक प्रश्न तिने विचारले आणि पप्पाने न कंटाळता आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.   

मंद वाऱ्याची झुळूक अधून मधून ओवीच्या केसांना गोंजारत होती .संध्याकाळची सोनेरी किरणे घरावरून अंगणात पसरली होती. तेवढ्यात आजी लगबगीने हातात काहीसे सामान घेऊन मागच्या शिवारातील बागेकडे गेली. ओवीला सुद्धा  कुतूहल वाटले आणि ती त्यादिशेने झेपावली.

बागेत जाऊन पहाते  तो काय…. आजी ,आजोबा,मम्मी जंगी तयारी करण्यात मग्न होते…. आजोबा  विटांची चूल करत होते आणि आजी स्वयंपाक बनवायला लागणारं सामान लावत होती… ओवी चे इवलेसे डोळे आश्च्यर्याने गोल गोल झाले… आणि पप्पानी हेच तिचे भाव ओळखून तिला म्हणाले……

SURPRISE !!!!!

ओवी ही तुझ्यासाठी ह्या वीकएंडची surprise party!!!!

ओवी नक्की काय चालू आहे ह्याचा अंदाज घेण्यात मग्न होती. तिचे डोळे भरभर सारे काही टिपून घेत होते. मीठ-मसाल्याचे डब्बे, स्वच्छ आणि ताज्या भाज्या , धगधगत्या चुलीवर ठेवलेलं वाफाळणारे पातेले,त्याच चुलीच्या विस्तवात ठेवलेली टम्म गोल वांगी. त्यांच्या खरपूस भाजण्याचा मंद सुवास.

आहाहा  क्या बात !!!

ओवी जाम खुश झाली. आणि तिने जोर्रात ओरडून विचारले…. “आज्जी ,आजच्या पार्टी चा मेनू काय आहे ?”

“ज्वारीची भाकरी ,वांग्याचे भरीत,कांदा भजी, कुळीथाचे पिठले,गावाकडचा लाल भात ,लसूण-मिरचीचा ठेचा ……. सगळे चुलीवर शिजवलेलं बरं का …ते तुम्ही नाही का हॉटेलात जाऊन खाता कोळशावरचे… त्याच्यापेक्षा फक्कड बेत आहे इथला “

“आज्जी, त्याला barbeque  असे म्हणतात …पण ते जाऊ दे…. तू मला सांग तू चुलीवर का बनवतेस ?गॅस संपला का ??”

“नाही ग बाई , पार्टी आहे ना आज. मग काहीतरी special नको का…. तू हे जेवण खाऊन तर बघ… आणि मग आम्हाला सांग”

ओवीने जोर्र्र्रात मान हलवली आणि धावत धावत ती  केळीच्या झाडामागे गेली .तिथे आज्जीने अनेक छोटी छोटी झाडे लावली होती… कोरफड,पुदिना ,अळूची पाने. बाजूलाच पालकची भाजी लावली होती. एरवी हे काहीच पाहायला न मिळणाऱ्या ओवीला काय करू अन कुठे जाऊ असे झाले होते. ओवीची शिवारातील भटकंती चालूच होती.एकीकडे जेवण तयार होत होते. दुसरीकडे हवेतील गारवा वाढत चालला होता. आजी पदर खांद्यावरून घेऊन भाकरी वळत होती. ओवीला थंडी वाजू लागली आणि तिला मम्मीने चुलीकडे बोट दाखवले. चुलीच्या उबेत ओवीला हात शेकवायला खूप मज्जा वाटत होती…

थोड्यावेळाने अंधार पडला.. आणि जेवणे चालू होती.. ओवीने नेहमीपेक्षा जरा चार घास जास्तच खाल्ले.. जराही कुरबुर न करता…त्यातच सर्वाना जेवणाची पोचपावती मिळाली..

जेवणानंतर तिला कधी पेंग आली हे तिलाही कळले नाही… सकाळी जाग आली ती कोंबड्याच्या आरवण्याने. उठताच ती मम्मीला शोधत मागील दारी गेली. चुलीवर पाणी गरम होत होते… पक्षांचे सुरेख आवाज कानावर पडत होते… वातावरण कसे शांत,प्रसन्न आणि उत्साही होते… कोंबडीची पिल्ले दाणे शोधत फिरत होती … ओवीने विचार केला कि इथे किती छान वाटतं आहे.. एखाद्या रिसॉर्टवर पण एवढी मज्जा येत नाही… आपण उगीच बोअर व्हायचो गावी यायला… मी आता पप्पाना सांगणार आहे की आपण एव्हरी वीकएंड इथेच येऊ….

सकाळची न्याहारी करताना तिने पप्पाना सांगितले आणि ते  जोरजोरात हसू लागले..

“बेटा ….प्रत्येक वीकएंड नॉट पॉसिबल हा पण अधून मधून आपण इथे नक्की यायचे … मे महिन्याची,दिवाळीची  सुट्टी पण आहेच की “

सुट्टीत इथे यायचे हे ऐकूनच ओवी खूप खुश झाली.

“मला अक्खा गाव फिरायचे आहे…नदीवर जायचे आहे …. पोहायचे आहे…. मग मंदिरात पण जायचे आहे….”

ओवी ची लिस्ट तयार होऊ लागली………

मम्मी,पप्पा,आज्जी,आजोबा एकमेकांकडे पाहून हसत होते. ओवीला  गावाकडची ओढ लागली होती. त्यांचा वीकएंड पार्टीचा प्लॅन यशस्वी  ठरला होता.