दीप अमावस्या – कथा आणि महत्व

आषाढ महिन्यातील अमावस्या म्हणजे दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या होय.

दीप अमावस्या पेक्षा गटारी अमावस्या म्हणून जास्त प्रसिद्ध. पण या दिवसाचे दीप अमावस्या म्हणून जास्त महत्व आहे. आपल्या संस्कृति प्रमाणे या दिवशी घरातील सर्व दिवे,समई घासून-पुसून त्यांची पूजा केली जाते. देवाला पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो.

या दिवसासाठी सुद्धा एक कथा आहे.

एक  आई  असते.  तिचा  मुलगा  खूप  आजारी  असतो.  ती  सर्व  प्रकारचे उपचार  करते  पण  तो काही  बरा होत नाही. एक  दिवस  स्वतः  यम रेड्यावर  बसून  त्याचा  जीव घेण्यासाठी येतो पण त्या  यामास  आई  सामोरी जाते.  ती  मुलासाठी  जीवनदान  मागते.  पण  असे  जीवनदान  देता  येणार  नाही  असे  यम  म्हणतो. पण  तिचे  मुलाविषयीचे  प्रेम  बघून  यम  त्याला  काही दिवसाची  मुदत देतो.  आणि  येत्या  अमावास्येला  मी पुन्हा परत येईल असे सांगतो.  काही  दिवस  उलटल्यावर  अमावास्याचे  रात्री  यम  पुन्हा  त्या आईच्या  घरी  जातो. बघतो  तर  काय,  तिने  पूर्ण घर  दिव्यांनी  उजळून  टाकलेले  असते.

घरात  सर्वत्र  रोषणाई  केलेली  असते.  यम त्या स्त्रीस म्हणतो – “आज  अमावस्या  आहे.  मी तुझ्या मुलाचे  प्राण नेण्यासाठी  आलो  आहे.”

त्यावर ती आई म्हणते -“कोण  म्हणेल  कि  आज  अमावस्या  आहे.  मी  लावलेल्या  दिव्यांमुळे  सर्वदूर  प्रकाश पसरला  आहे.  तर  तू  माझ्या  मुलाला  जीवनदान  दे. “

आईच्या वेडया मायेवर प्रसन्न होऊन यम तिच्या मुलास जीवनदान देतो आणि त्या दिवसापासून आषाढी अमावास्येला  दीप पूजनाची  प्रथा  सुरु  झाली  आणि  आषाढी  अमावस्याची  दीप अमावस्या झाली.

शास्त्रीय  कारण  पाहिले तर श्रावणातील काळ हा सर्व प्राण्यांचा प्रजनन काळ असतो.  त्याचप्रमाणे वातावरणामध्ये   दमटपणा  वाढलेला  असतो.  त्यामुळे  पचनशक्ती  मंदावलेलीच  असते.  या सर्व गोष्टींचा विचार  करून  पुढील काळात  मांसाहार करता  येत नाही  म्हणून आषाढ महिन्या पर्यंत मांसाहार अधिक प्रमाणात  केला  जाऊ  लागला  आणि  हळू हळू  त्याचे  रूपांतर  “गटारी”  साजरी  करण्यात  झाले.  आणि  त्या मागे  दीप अमावास्येचा  महत्व  कमी  झाले.  पण  मुळात  आषाढ  अमावस्या  ही  दीप अमावस्या  म्हणून साजरी  करणेच  योग्य आहे.

दिव्यांच्या  ज्योतीकडून  त्या  तेजाने आपले  आयुष्य  हे अज्ञानाच्या  अंधारातून  ज्ञानाच्या  तेजाने  भरून काढूया.

या  दिवशी  दिव्यांची  पूजा  करून,  घरातील  सर्व  व्यक्तींसाठी  दिर्घायुष्य,  उत्तम  आरोग्य  मागूयात आणि  पुढे येणाऱ्या  श्रावणातील  सणांसाठी  सज्ज  होऊयात.