रक्षाबंधन

Rakshabandhan

रक्षाबंधन बहीण भावांचा जिव्हाळ्याचा सण. राखी ही केवळ शोभेची वस्तू नसून खरे तर एक रेशमी बंधन असते. 

लहानपणी भाऊरायाला बांधायला राखीची खरेदी म्हणजे अगदी आवडीची बाब. कुणाची राखी सगळ्यात छान अशी चढाओढ असायची आणि भाऊराय पण ऐटीत राखी मिरवायचे. खरेतर त्याची पण वेगळी स्पर्धा असायची. कुणाच्या हाती किती राख्या अशी ती गम्मत.

पण जसे जसे आपण मोठे होत जातो, तशी देखाव्याची स्पर्धा कमी होत जाते आणि सासरी गेलेल्या बहिणीला भेटण्याची हुरहूर, भावाशी गप्पा मारायची ओढ लागून राहते.

बहीण-भावाचा नात्यातले बंध खरोखर ह्या सणांमुळे घट्ट झाल्यासारखे वाटतात. रस्त्यावरून जातांना लहान बहीण-भावाला बघितले तर त्या भावाकडे बहिणीसाठी असलेली संरक्षणाची भावना आणि बहिणीच्या मनातील काळजी कळून येते. अशा सणाच्या निमित्ताने आपल्यावर नकळत संस्कार रुजवले जातात हेच खरे.

पुराणातही बहीण-भावाचे अनेक किस्से आपण ऐकून आहोत. कृष्णा सारखा महान भाऊ वेळोवेळी आपल्या द्रौपदी बहिणीची मदत करताना दिसतो. अगदी वस्त्रहरणासारख्या खूप मोठ्या संकटा पासून ते वनामध्ये असताना आलेल्या छोट्या-मोठ्या प्रसंगांमध्येही श्रीकृष्णंच धावून आलेला दिसतो. तसेच छोटे बहीण भाऊ म्हणजे ज्ञानदेव-मुक्ताई. बहिणीच्या हट्टासाठी ज्ञानदेवांनी आपली पाठ इतकी तापवली कि त्यावर मांडे भाजता आले. रावण म्हणजे राक्षसच. पण बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी युद्धसही तयार झाला.

रक्षाबंधन ह्या शब्दाची फोड करायची झाली तर रक्षा + बंधन म्हणजेच रक्षा करण्यासाठी दिलेले वचन. भाऊ बहिणीचं रक्षण करण्याचे वचन देतोच पण त्याच बरोबर आजच्या काळात बहिणीही खंबीरपणे भावांच्या मागे उभ्या असलेल्या पाहायला मिळतात. असं बहीण भावाच अगदी आगळं-वेगळं खट्याळ नातं . वेळेला एकमेकांचा आधार आणि इतर वेळेस नुसत्या कोपरखळ्या .

नात्यांची जपणूक, त्याचंच प्रतीक म्हणून बहिणीने भावाला भेटण्याचा हा दिवस. अश्या ह्या नात्याचं सुंदर प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.