श्रावण अमावस्या – पिठोरी अमावस्या/ बैल पोळा

पिठोरी अमावस्या

श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या. खेडोपाड्या मधे या दिवशी तेरड्याच्या रोपांची तिनीसांझेला पूजा केली जाते. वालाची भाजी, भेंड्यांची भाजी, मोदकाचा नैवद्य दाखवला जातो आणि या लेकुरवाळ्या पिठोरी माते समोर घरातील लहान मुलांसाठी आरोग्य आणि दीर्घायुष्य मागितले जाते.

या दिवशी मातृका पूजन ही केले जाते.

श्रीकृष्ण जेंव्हा पहिल्यांदा आपल्या आई वडिलांना म्हणजेच वासुदेव व देवकी यांना भेटले तेंव्हा त्यांना खूप आनंद झाला. श्रीकृष्ण हा देवकीचा आठवा मुलगा. त्या आधीची देवकीचे सात मुले कंसाने मारली. परंतु आईच ती. तिला मुलांची पदोपदी आठवण येत असे. श्रीकृष्णाला बघितल्यावर तिच्या आयुष्याचे सार्थक झाले. देवकी ने श्रीकुष्णाला एक विनंती केली कि जसे तू तुझ्या गुरुमातेला तिच्या देवाघरी गेलेल्या मुलाला भेटण्याचे भाग्य दिलेस त्याच प्रमाणे मला ही माझ्या सात मेलेल्या मुलांना एकदा तरी भेटायचे आहे. श्रीकृष्णाने आईची ही इच्छा पूर्ण केली पण त्याच बरोबर तिने दुसऱ्याबरोबर तुलना केल्यामुळे तिला श्राप दिला कि पिठोरी अमावास्येला तुझी प्रतीकात्मक पूजा तिन्हीसांजेला केली जाईल पण तुझे तोंड सकाळी कोणीही बघणार नाही. सूर्योदयापूर्वी तुझे विसर्जन केले जाईल. आणि अशा प्रकारे पिठोरी पूजनास सुरुवात झाली.

तिन्हीसांझेच्या वेळेस तेरड्याची रोपे स्वच्छ धुवून त्यावर नवीन कोरे कापड अंथरले जाते. सूपा मध्ये ठेवून रोपांची पूजा केली जाते. घरातील स्त्री वर्ग त्या भोवती रांगोळी काढतात. फुलांनी सजावट करतात. पावसाळ्याच्या मौसमात येणाऱ्या विविध फळांचा नैवद्य दाखवतात. जसे की केळी, काकडी, खरबूज इत्यादी. देवीची खणा-नारळाने ओटी भरली जाते. दिवसभराचा उपवास रात्री देवीची आरती करून, नैवद्य दाखवून सोडला जातो.

रात्री जागरण केले जाते. झिम्मा-फुगडी घालत रात्र जागवली जाते. घरातील मुली, बायका, मैत्रिणी एकत्र येऊन धमाल-मजा करतात.

सकाळी सूर्योदयाचे आधी घरातील कोणी मोठी व्यक्ति सर्व आवरून देवीचे विसर्जन करतात.

श्रावण अमावास्येला पिठोरी पूजन करून लहान मुलांचे आयुष्य व आरोग्यसाठी प्रार्थना करतात व घरात सुखसमृद्धी नांदावी म्हणून देवीची आळवणी करतात.

या दिवशी बैलपोळा हा ही दिवसही साजरा केला जातो. वर्षभर बैलांकडून शेतीची कामे करून घेतली जातात. त्याविषयी कृतज्ञता म्हणून बैलांची पूजा केली जाते. गरम पाण्याने आंघॊळ घालून बैलांना सजवले जाते. पायात घुंगरू बांधले जातात. शिंगे रंगवली जातात. रंगीबिरंगी झालर पांघरली जाते. या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही. बैलांना पुरणाचा घास खाऊ घातला जातो. अशा प्रकारे बैल पोळा साजरा केला जातो.

या दिवशी मातृदिन ही असतो. “मातृदेव भव:” ही आपली संस्कृती आहे. आईच्या पाया पडून या दिवशी तिच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आईचे उपकार न फेडता येण्यासारखे आहेत. परंतु या दिवशी त्याचे स्मरण करून आई विषयी असलेली आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याच्या हा दिवस.