भोंडला

ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करिन तुझी सेवा

अशा सुरेख  ओळींनी  कार्यक्रमाला सुरुवात होते.  हातात हात धरून फेर धरले जातात .त्यात सोबत वाद्यवृंदांचा आवाज. अनेक ठिकाणी ही अशी भोंडल्याची गाणी आजकाल ऐकायला मिळतात.

मागील काही वर्षे हा भोंडला (ह्याचे दुसरे नाव हादगा किंवा भुलाबाई) सुप्तावस्थेत होता असे म्हणायला काहीच हरकत नसावी. पण आता मात्र परत एकदा ह्या कार्यक्रमाला पुनर्जीवन मिळाले आहे. जुन्या अनेक प्रथा आता परत फॅशन मध्ये येत आहेत .तसेच काहीसे या भोंडल्याचेही. म्ह्णून त्याच्याविषयी हा लेख.

शारदीय नवरात्रोत्सव म्हटला की जसे दांडिया,गरबा आला तसेच  महाराष्ट्राचा भोंडला !! हा भोंडला नवरात्रींमध्ये खेळला जातो. लहान मुली घरांच्या गच्चीवर किंवा कुणाच्या तरी अंगणात खेळत असत. तर स्त्रीवर्ग मंदिराच्या पटांगणात किंवा एखाद्या मैत्रिणीच्या घरी हा कार्यक्रम करत.

आजकाल गडद रंगाच्या काठपदरी नववारी नेसून, नथ,चिंचपेटी, ठुशी असे पारंपरिक दागिने लेऊन ,केसांत भरगच्च गजरा  माळून सर्व मैत्रिणी भोंडल्याच्या तालावर नाचायला उत्सुक असतात. चिमूरड्या मुलीही खणाचे परकर पोलकं  घालून ,मोत्याचे दागिने घालून फेर  धरायला सर्वात पुढे असतात. मध्यभागी पाटावर किंवा चौरंगावर हत्तीचे चित्र काढून त्याभोवताली रांगोळी काढली जाते. सर्व लहान मोठ्या मुली, स्त्रिया हातात हात घालून फेर धरतात आणि एक एक भोंडल्याच्या गाण्यांची मैफिल जमते .

पूर्वी स्त्रिया फारसे घराबाहेर पडत नसत. चूल,मूल हीच त्यांची जबाबदारी असे. ह्या सर्वातून त्यांनाही बाहेर पडता  यावे, थोडा मोकळा वेळ मिळावा म्हणूनच की काय  अशा कार्यक्रमांचे प्रयोजन करण्यात आले. सर्व सख्यांसोबत एकत्र येऊन आपल्या मनातील भावना, अनुभव  एकमेकांबरोबर त्या मोकळ्या करत असत. प्रत्यक्षात मोकळेपणानं बोलता येत नसे .मग अशावेळी ह्या भोंडल्याच्या गाण्यांचा आधार घेतला जाई. ही गाणी नात्यांवर , नात्यांमधील आपलेपणावर भाष्य  करतात तर कधी दुजाभाव, राग  असेही व्यक्त करताना दिसतात. त्यातील ही काही गाणी :

 1. काळी चंद्रकळा नेसू कशी
  पायात पैंजण घालू कशी
 2. कारल्याचे वेल लाव गं सुने लाव गं सुने,
  मग जा आपल्या माहेरा माहेरा…..
 3. अरडी गं बाई परडी
  परडी एवढं काय गं
  परडी एवढं फूल गं
  दारी मूल कोण गं
 4. नणंदा भावजया दोघी जणी
  घरात नव्हतं तिसरं कोणी

तर काही गाणी ही निखळ मनोरंजन करणारी असत.त्यातून दैनंदिन जीवनातल्या गंमतीजंमती सांगितल्या जात. जशी की ही गाणी.

 1. श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.
  असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं
 2. हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
  त्यातलं उरलं पीठ त्याचं केलं थालीपीठ
 3. अक्कण माती चिक्कण माती
  अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं

पूर्वी घरातील कामे फार कष्टाची असत. हल्लीप्रमाणे फ्रिज, वॉशिंग मशीन, कार  अशा सुखसुविधा तेव्हा नव्हत्या. त्यामुळे थकलेल्या शरीर व मनाला विरंगुळा देण्यासाठी फक्त बायकांचेच हे गेट-टुगेदर असे समजा हवे तर . अशा वेळेस स्वयंपाक ही महत्त्वाची कला समजल्या जाणाऱ्या काळात स्त्रियांकडून काही खानपानाची व्यवस्था न झाल्यास आश्चर्य  !! प्रत्येक जण येताना काहीतरी खाऊ घेऊन येत असत. त्याला खिरापत (प्रसाद)  असे म्हटले जाई . कार्यक्रमाची सांगता झाल्यावर सर्व जणी आणलेला खाऊ प्रत्येक पानात थोडा थोडा देऊन एकत्र बसून त्याचा आनंद घेत. लहान मुलींचा भोंडला असेल तर आई डब्यात साखर फुटाणे,लाह्या,लाडू,चिवडा असा खाऊ देई  व मुली तो काला करून मज्जेत फस्त करीत.

सर्व गाणी म्हणून झाली ,फुगडया खेळून पाय दुखू लागले कि आपसूक  पेटपूजेची आठवण होई. मग कार्यक्रमाची सांगता करायची वेळ झाली कि सर्वात शेवटचे गाणे ते असे.

आड बाई आडोणी,आडाचं पाणी काढोनी,आडात पडला शिंपला,आमचा भोंडला संपला

भोंडला संपताच खिरापतीची हाक मिळे. लहान मुलींपासून आजींपर्यंत साऱ्या हसत, एकमेकींची चेष्टा करत खिरापत खात .

तो काळ  वेगळा अन  तेव्हाची परिस्थितीही .पण आज जरी काळ बदलला असला तरी सणांची, उत्सवांची गम्मत तशीच आहे. फक्त गरज आहे त्याचे मूळ लक्षात घेऊन, ते कसे व का साजरे केले गेले पाहिजेत हे डोळसपणे समजण्याची. नवरात्रीचा जागर म्हणून आणि खऱ्या अर्थाने देवीची पूजा करून आपण हा भोंडला व असेच  अनेक सण साजरे करुयात आणि खऱ्या अर्थाने संस्कृतीचे जतन करूयात.