Chanting Mantras

मंत्रोच्चार आणि नामस्मरण (Chanting Mantras)

कितीही दुःख होत असू दे किंवा कितीही त्रास होत असू दे पण  अशा प्रसंगी जर आपण आपली श्रद्धा असलेल्या कोणत्याही देवाचे नामःस्मरण केले तर नक्कीच मन शांत होते.

पण मग असे नामःस्मरण आपण रोज केले तर ?

तर नक्कीच आपले मन इतके ताकदवान झालेले असेल कि समोर येणारी कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या मनाला शिवूच शकणार नाही. नामस्मरणामुळे मनाची ताकद एवढी वाढते कि अशक्य गोष्टीही मनाच्या ताकदीवर पूर्ण होऊ शकतात .

वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला तो ह्या नामःस्मरणच्या शक्तीमुळे. क्षणभर डोळे मिटून एकाग्रचित्त होऊन नामःस्मरण केलेत तर किती शांत,प्रसन्न वाटते. क्षणार्धात सर्व क्षीण ,उदासीनता  निघून जाते . कोणताही मंत्र घेतला तरी त्यात ॐ चा  उच्चार आहेच. योगसाधना असो किंवा आयुर्वेद ,ह्यांत “ॐ” उच्चाराला खूप महत्व आहे. असेही म्हटले जाते की मंत्रोच्चार करीत जर का आपण स्वयंपाक केला तर त्या सात्विक जेवणाची चव काही औरच असते. ह्याचा अनुभव आपण कित्येकदा घेतोच. जेव्हा आपण प्रसाद म्हणून देवळातील अन्न प्राशन करतो त्यावेळेस त्या सध्या भाज्यांची, वरण -भाताची चव सुद्धा काही निराळीच असते .

आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेल्या अनेक प्रथा-परंपरा आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री निजेपर्यंत अनेक नामोच्चार म्हटले जात असत. अजूनही काही घरात आजी,पणजी असे नामोच्चार करताना आपल्याला दिसतात. सकाळी उठल्या उठल्या करदर्शन म्हणजेच “कराग्रे वसते लक्ष्मी”, अंघोळी दरम्यान आवडत्या देवाचे स्तोत्र,  मग देवाची पाठपूजा, नित्यकर्मे सुरु करताना म्हणावयाची स्तोत्रे ,जेवणापूर्वी म्हणण्याचे  “वदनी कवळ घेता”, तिन्हीसांजेस म्हणण्याची शुभंकरोती अशी अनेक स्तोत्रे आहेत. ही अशी स्तोत्रे म्हणण्याचे कारण म्हणजे एकाग्रता वाढीस लागते, कामातून येणारा क्षीण नाहीसा होतो,  उच्चार स्पष्ट होतात, जितक्या लहान वयात आपण मुलांकडून मंत्र, श्लोक, स्तोत्रे पाठ करून घेऊ  तितकी त्यांची  बौद्धिक,मानसिक  वाढ उत्तम होते.

“हृदयस्थ नारायण” ह्या उक्तीप्रमाणे आपल्या हृदयामध्ये नारायणाचे म्हणजेच विष्णूचे स्थान आहे. विठ्ठल हे हि विष्णूचेच रूप असे आपल्या पूर्वजांनी अनेक वेळा म्हटले आहे. काही  वैज्ञानिक संशोधनामध्ये असे आढळले आहे की विठ्ठल नामाच्या उच्चारामुळे हृदयाचे आरोग्य वाढते. ते अजून बळकट होते . 

लवकरच आषाढी एकादशीचा योग जुळून  आलाय.काय  म्हणताय मग ? आपणही नामःस्मरणाला सुरुवात करूयात. ते ही विठ्ठल नामापासून.

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ।।

एकदा वारीचा आनंद अनुभवून बघूयात. काही काळ त्यात पायी चालून रिंगण खेळुयात . चालता चालता विठुरायाचे नाव घेत परिस्थिती कशीही का असेना सतत पुढे जाण्याचे बळ मग कसे मिळेल ते बघाच  !

विठूचा, गजर हरिनामाचा झेंडा रोविला ,
वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला ||

|| पंढरीनाथ महाराज की जय  ||