दत्त जयंती

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला. या दिवशी सर्वत्र दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो.

दत्त जयंतीच्या आधीच्या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचे पारायण केले जाते. मंदिरात भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होतात. दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश या देवांचे एकत्रित रूप आहे. की ज्या तत्वांवर आपले जीवन  चक्र चालते. “दत्तात्रय” म्हणजे “दत्त” व “आत्रेय”. दत्त म्हणजे खुद्द परब्रम्ह तर आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. दत्त जन्माचा अनेक कथा आहते.

पुराणात सांगितल्या प्रमाणे इंद्रदेव हा स्वर्गाचा राजा आहे. तर पृथ्वीचे कार्य हे ब्रम्हा, विष्णू व महेश या देवांकडे दिले आहे. म्हेणजेच ब्रम्हा उत्पत्ति, विष्णू पालन तर महेश संहार. देवांमध्ये ही कामाचे वाटप झाले आहे. तर अशा या देवांची एक गोष्ट.

पूर्वी अत्री, अंगिरस, पुलस्य, पुलह, वशिष्ट असे ऋषि होऊन गेले. त्यातील अत्री ऋषींची पत्नी अनुसया ही सत्वशील, पतिव्रता स्त्री होती. त्यामुळे तिला सामर्थ्य प्राप्त झाले होते. साक्षात सूर्य, अग्नी, वायू, धरती हे तिच्या चरणी नम्र झाले होते.

देवांचा राजा इंद्र याला ती स्वर्गावर आपली सत्ता स्थापन करेल अशी भीती वाटत होती. देवतांच्या पत्नी ही तिचे प्रातिवत्य पाहून खट्टू होऊ लागल्या. सर्वांनी ब्रम्हा, विष्णू व महेश यांना विनंती केली की, तुम्ही अनुसयेची सत्व परीक्षा घ्यावी.

त्यावर तिन्ही देव अनुसयेची सत्व परीक्षा घेण्यासाठी अत्री ऋषिंच्या आश्रमात गेले. संध्येसाठी ऋषि बाहेर गेले असताना देव तेथे पाहुचले तिन्ही देव आपल्या घरी आले हे पाहून अनुसया खूप खूष झाली. तिने त्यांचे आदरातिथ्य केले. त्यावर देवांनी तिच्याकडे इच्छाभोजनाची मागणी केली. ती सुद्धा त्यासाठी तयार झाली. देवांना तिचे सत्व हरण करायचे होते. त्यांनी तिच्याकडे विवस्त्र होऊन भोजन वाढायची मागणी केली. पातिव्रताच ती अनुसया स्वयंपाक घरात गेली, आपल्या देवाचे स्मरण केले, आपल्या पतीचे स्मरण केले व स्वयंपाक तयार केला. तिला कळून चुकले होते की, ही आपली परीक्षा आहे. तिने मनात निर्धार केला की, माझ्या पतीचे तपोबळ आता माझ्या मदतीस येईल. ती विवस्त्र झाली व जेवण घेऊन बाहेर गेली पाहते तर काय, तिन्ही देवांची बालके झाली होती.

तिच्या प्रातिव्रत्यापुढे भल्या मोठ्या देवांनाही लहान बालके व्हावे लागले होते. काही वेळात तिचे पती अत्री ऋषी बाहेरून घरी आले. पाहतात तर काय, ही तिन्ही बालके कोण? तर अनुसयेने सर्व हकीकत सांगितली.

पुढे ही तिन्ही बालके अत्री-अनुसया यांच्या घरी नंदू लागली. तिकडे त्याच्या वरील जवाबदारी पार पाडण्यामध्ये अडथळे निर्माण झाले. सर्व देव नम्र होऊन अनुसयेच्या घरी आले आणि तिची माफी मागितली आणि विनंती केली की आमचे देव आम्हाला परत कर. त्यावर ती म्हणाली की मी त्यांना इथे आणले नाही. ते स्वतःच इथे आले आहेत आणि आता ती माझी बालके आहेत. मी त्यांना परत देणार नाही. त्या नंतर ब्रम्हा, विष्णू व महेश यांनी प्रसन्न होऊन आपले रूपच म्हणजे दत्तात्रय म्हणून अनुसयेच्या पोटी जन्म घेतला.

श्रीक्षेत्र गाणगापूर हे दत्तात्रयांचे स्थान आहे. दत्त अवताराच्या वेळी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम बऱ्याच प्रमाणात झालेले दिसते. अंधश्रद्धेपेक्षा देवावरची श्रद्धा श्रेष्ठ  हे अनुभव दत्तांनी जनमानसाला दिले. कोणाचा बळी देऊन किंवा स्वतःला त्रास करून काही साध्य होत नाही. परंतु भक्तीच्या मार्गानी असाध्य गोष्टीही सध्या करता येतात. हे दत्तगुरूंनी लोकांना शिकविले. त्या काळात असुरी शक्तीचा प्रभाव होता. वेळोवेळी दत्तांनी वेगवेगळ्या रूपात अवतार घेऊन लोकांना तारले.

हालाकीच्या परिस्थित गांजलेल्या व्यक्तींना आधार देण्याचे काम दत्त गुरूंनी केले. संकटाच्या वेळी त्याचे निवारण करण्यासाठी, आपल्या भक्तांना तारण्यासाठी दत्त हजार होत असत. त्यामुळेच की काय पण “दत्त म्हणनू हजर होणे” ही म्हण प्रचलित झाली.

“गुरुदेव दत्त”