हरतालिका

हरतालिका

।। श्री हरतालिका ।।

भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका हे व्रत केले जाते. खरे तर मुली वयात आल्या पासूनच हे व्रत करावयास सुरुवात करतात. “हरिता” म्हणजे आरण्य व “आलिका” म्हणजे सखी. पार्वतीने आपल्या सखीला म्हणजे मैत्रिणीला बरोबर घेऊन हे व्रत अरण्यात जाऊन केले म्हणून याला हरतालिका व्रत असे म्हणतात.

हरतालिका व्रताची कथा:

शिव पार्वतीचे लग्न झाले हे पार्वतीचा पिता दक्ष प्रजापती यांना बिलकुल मान्य नव्हते. त्यांनी जावई शंकर व मुलगी पार्वती यांचा स्वीकार केला नव्हता.

एके दिवशी दक्ष प्रजापती यांनी महायज्ञयागास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सर्व आप्तमंडळींना आमंत्रणे दिली. सर्व देवांना बोलावणे केले. परंतु शिव-पार्वतीस त्यांनी यातून वगळले. हे पार्वतीस माहित झाल्यावर ती फार दुखी झाली. त्यावर नारद मुनींनी पार्वतीस सांगितले की मुलीने आपल्या पित्याच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची वाट का पाहावी? मान-अपमानाकडे का बघावे? हे पार्वतीसही पटले व ती आपला लवाजमा घेऊन, नंदीवर बसून आपल्या पित्याच्या घरी कार्यक्रमासाठी पोहोचली. तिथे गेल्यावरही तिचा व शंकराचा अपमान करण्यात आला. ते पार्वतीस सहन न झाल्यामुळे तिने महायज्ञकुंडात उडी घेतली.

पुढील जन्मी पार्वती ही हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली. त्रिलोकात तिच्या एवढे सुंदर कोणी ही नव्हते. हिमालयास आपल्या मुलीचा विवाह हा श्रीविष्णूशी व्हावा असे वाटत होते. त्याने तसे पार्वतीस बोलून दाखविले. तर पार्वती म्हणाली की पार्वती ही फक्त शंकराचीच आहे. तर तुम्ही माझा विवाह शंकराशी लावून द्या. हिमालयास ते मान्य नव्हते. पार्वती म्हणाली की पार्वती ही शिवाची शक्ती आहे. असे बोलून पार्वती आपल्या सखी सोबत अरण्यात निघून गेली. नदी काठी जाऊन वाळूचे शिवलिंग बनवून त्याची उपासना करती झाली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. पार्वतीने आपला उपवास चालू ठेवला. तिची भक्ती पाहून भोळा शंकर बटुवेशात तिच्या समोर हजर झाले. तिला विचारले की तू हे व्रत का केले आहेस? तुझ्या मनात काय आहे? त्यावर पार्वतीने असे सांगितले की  श्रीशंकर माझे पती व्हावे म्हणून मी ही उपासना करीत आहे. बटुवेशातील शंकरानी पार्वतीस समजविण्याचा खूप प्रयत्न केला पण पार्वती काही तयार होईना. मग तिची भक्ती पाहून शंकरानी तिला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. त्यावर तिने तुमच्या अर्धांगी ठाव द्या असे मागितले. अशा प्रकारे हरतालिका व्रताची सुरुवात झाली.

बाजारात व्रतासाठी लागणाऱ्या मूर्ती सहज उपलब्ध होतात. तसेच या पावसाळ्यामध्ये उगवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकाराच्या वनस्पती ही पत्री म्हणून या पूजेसाठी वापरल्या जातात. जसे की हरडा, बेहडा, जास्वंद, दुर्वा, बेल, तुळस इत्यादी. वाळूचे शिवलिंग तयार केले जाते. पूजेचा साक्षिदार म्हणून गणेश विड्याचे ही पूजन केले जाते. फळाचा नैवेद्य दाखविला जातो. अशा प्रकारे पूजा केली जाते. दिवसभर उपवास केला जातो. दुसऱ्या दिवशी श्रीगणेशाचे आगमन होते. त्यांची पूजा करून उपवास सोडला जातो.

घरात सुख समृद्धी यावी, अविवाहित मुलींना मनाजोगा पती मिळावा या साठी हे व्रत केले जाते. कुटुंबाचे कल्याण व्हावे यासाठी हे व्रत लग्नानंतरही केले जाते.