होळी पूर्णिमा

हिंदू वर्षांमधील शेवटचा महिना फाल्गुन. या महिन्याच्या पूर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. तसे पहिले तर हिंदू पंचांगा प्रमाणे हा वर्षातील शेवटचा सण असतो. तर गुढीपाडव्याने नवीन वर्षास सुरुवात होते.

असो, होळी हा सण मुख्य:त्वे करून महाराष्ट्रात साजरा केला जातो. खेडोपाड्यामध्ये होळीच्या आदी पासून नऊ दिवस छोट्या- छोट्या होळ्या लावण्याची पद्धतआहे आणि दहाव्या दिवशी म्हणजे पूर्णिमेला मोठी होळी लावली जाते. लहान मुले वेग-वेगळी सोंगे घेऊन घरोघरी होळीची वर्गणी मागायला येता. तसे पहिले तर होळी हा सण दहा दिवस साजरा केला जातो पण आजकालच्या धकाधकीच्या काळात त्यासाठी वेळ नसल्यामुळे होळीच्या दिवशीच होलिका दहन केले जाते. या होलिका दहनाची एक गोष्ट आहे.

फार पूर्वी हिरण्यकश्यपू  नावाचा एक राजा होता. तो फार पराक्रमी होता. आपल्या प्रजेची तो चांगल्या प्रकारे काळजी घेत असे. त्यामुळे प्रजाही त्याच्यावर खूप खुश होती. कालांतराने त्यास वाटू लागले की, आपणच देव आहोत. सगळ्यांनी आपल्याला पूजावे, देव मानावे. प्रजेला धाक दाखवून तो ते करत असे. परंतु त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद हा मात्र विष्णूचा निःसीम भक्त होता. त्याला भक्त प्रल्हाद असेच नाव पडले होते. एकीकडे हिरण्यकश्यपू स्वयंघोषित देव होता तर दुसरी कडे त्याचा मुलगा हा सतत नारायणाचे नामस्मरण करीत असे. हे हिरण्यकश्यपूस अजिबात मान्य नव्हते. त्याने भक्तप्रल्हादास खूप समजावले की “मी देव आहे. माझे नाव घे.” परंतु भक्तप्रल्हादास ते मान्य नव्हते. म्हणून हिरण्यकश्यपू ने प्रल्हादास शिक्षा करण्याचे आदेश दिले. त्याला उकळत्या तेलाच्या कढई मध्ये टाकण्यास सांगितले. भक्तप्रल्हाद घाबरला नाही. तो “नारायण-नारायण” नामस्मरण करीत असल्यामुळे देवाने येऊन त्याचे रक्षण केले. तेल थंड झाले. यावर हिरण्यकश्यपू चिडला. त्याने डोंगराच्या उंच कड्यावरून भक्तप्रल्हादास ढकलून देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सैनिक त्याला घेऊन उंच कड्यावर गेले. तेथून त्याला ढकलून दिले. परंतु नामस्मरण करीत असल्यामुळे नारायणाने भक्तप्रल्हादास वरच्या वर झेलले व त्याची सुटका केली. तो सुखरूप आहे हे पाहून हिरण्यकश्यपू अजूनच चिडला. त्याने सैनिकांना भक्तप्रल्हादास चिडलेल्या, माजलेल्या हत्तीच्या पायाखाली देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सैनिक भक्तप्रल्हादास घेऊन हत्तीसमोर गेले. तेथेही भक्तप्रल्हाद हात झोडून “नारायण-नारायण” नामस्मरण करित संकटास सामोरा गेला.  त्यास पाहून चिडलेला हत्तीही शांत झाला. हे पाहून हिरण्यकश्यपू फारच चिडला. त्याने ही सर्व हकीकत आपली  बहिण होलिका हिस सांगितली. त्यावर तिने शेवटचा उपाय म्हणून एक युक्ती लढवली.

तिला ब्रह्म देवाकडून एक वर प्राप्त होता, की ब्रह्मदेवाने तिला एक अशी शाल दिली होती, जी पांघरून तीने अग्निमध्ये प्रवेश केला तरी ती जळणार नाही. तिचे आगीपासून संरक्षण होईल. तिच्या या वराचा तिने उपयोग करायचे ठरवले. त्या प्रमाणे एक दिवस निश्चित करण्यात आला. त्यासाठी लाकडे रचून तयारी करण्यात आली. मग होलिका भक्तप्रल्हादास घेऊन त्या लाकडांच्या शय्येवर बसली. आग प्रज्वलीत करण्यात आली. वराचा दुरुपयोग केल्यामुळे होलिका जळून खाक झाली परंतु भक्तप्रल्हाद डोळे मिटून शांतपणे नामस्मरण करत बसला होता. त्याला काहीच इजा झाली नाही. आणि त्या दिवसापासून होलिका दहनास सुरुवात झाली. तो दिवस फाल्गुन पूर्णिमेचा होता.

अशा प्रकारे होळीचे दहन करणे फार पूर्वी पासून चालत आले आहे. साधारणपणे होळी लागण्यापूर्वीच काळ हा हिवाळ्याचा असतो. या काळात हवेत गारवा असतो तर होळीच्या दहनानंतर आपोआपच तापमानात वाढ होत जाते. उन्हाळ्याला सुरुवात होते. पावसाळा त्यानंतर हिवाळा या ऋतूमध्ये हवे मध्ये काही विषाणूंची वाढ होत असते. होळी दहनामुळे अश्या विषाणूंचा नाश होण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्रकारची औषधी लाकडे जाळली जात. आजही शेण्या, गोवऱ्या, कापूर यांचा होळीदहनच्या वेळी लाकडांबरोबर जाळण्यासाठी  वापर केला जातो. हे असे पदार्थ हवेतील जंतूंचा नाश करण्यासाठी उपयुत ठरतात.

होळी हा सण वेगवेगळ्या गावोगावी साजरा केला जातो. त्यामध्येही थोडी फार विविधता आढळते . कोळी बांधवांच्या होळीची मज्जा तर औरच असते. त्यांच्यामध्ये कोणाची होळी मोठी, अशी स्पर्धा लागते. या दिवशी उपवास केला जातो. तिन्हीसांजेला होळीची पूजा केली जाते. पुरणपोळीचा नैवद्य दाखवून दिवसभराचा उपवास सोडला जातो. आणि मग रात्री होलिका दहन केले जाते. वृक्षतोड नको म्हणून आजकाल छोट्या-छोट्या प्रतीकात्मक होळ्या लावण्याची पद्धत रुजू होत आहे. परंतु पूर्वी आज लावलेली होळी ही पुढील चार ते पाच दिवस धूमसत असे. त्यावर पाणी तापवून त्याने आंघॊळ केली तर त्वचा रोग दूर होतात, असा समज पूर्वी होता.

होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन म्हणजेच करिदिन या दिवसाचा उत्साह काही वेगळाच. रंग लावून एकमेकांना शुभेच्छा देत हा सण साजरा होतो. लहान मुले, मोठी माणसे सर्वच जण अगदी उत्साहने ही धुळवड साजरी करतात आणि गातात…

होळी रे होळी पुरणाची पोळी!