कोजागरी पौर्णिमा

kojagari pornima

कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा या दिवसाला नवान्न पौर्णिमा असेही म्हंटले जाते. पावसाळा संपून नुकतीच हिवाळ्याची सुरुवात झालेली असते. एकिकडे ऑक्टोबर हीट तर दुसरी कडे पहाटेस पडणारे दव, थंडावा असे सुखद वातावरण.

या दिवसात साधारणपणे भातशेती तयार होते. कापणीसाठी पिवळंधमक सोनंच जणू शेतात उभ असत. या अशा नवीनच आलेल्या धान्याची खीर या दिवशी केली जाते व देवाला नैवद्य दाखवला जातो. म्हणून या दिवसाला नवान्न पौर्णिमा असे म्हटले जाते.

या दिवशी फूला-पानांची तोरणे, नवीन उगवलेले धान्य म्हणजे काही ठिकाणी नवं बोलण्याची पद्धत आहे. ते घराच्या दाराला बांधल जात. या दिवशी लक्ष्मी व ऐरातावर बसलेल्या इंद्रदेवाची पूजा केली जाते. घरात समृद्धी नांदावी, भरभराट व्हावी म्हणून प्रार्थना केली जाते. घरात गोडा-धोडाचे बेत केले जातात.

या दिवशी, रात्रीच्या वेळी लक्ष्मी घरी येते अशी श्रद्धा आहे आणि ती विचारते कि “को जागरती”. म्हणून हि पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा म्हणून प्रसिद्ध आहे. अशा येणाऱ्या लक्ष्मीच्या आगमनाची तयारी म्हणून घर फुला-पानांनी सजविले जाते. दिवे लावून उजळविले जाते. शारदातील चांदणे तर प्रसिद्ध आहेच. 

चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असल्यामुळे तो मोठा व तेजस्वी दिसतो. अशा चंद्राचे मोहक रूप रात्रीच्या वेळी, अंगणात येवून, दुधातून बघण्याची प्रथा आहे. तसेच दुधात केशर, सुकामेवा घालून मसाला दूध तयार केले जाते. आजकाल पूर्वी सारखे अंगण राहिले नाही पण बिल्डिंगच्या गच्चीवर आजही मोठ्या हौशीने कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. आप्तजनांसोबत, मित्र-मैत्रिणी सोबत मेजवानीचे बेत आखले जातात. सोबतीच मसाला दूध आहेच. ह्या सगळ्याची मजा काही औरच आहे.

अशाच एका कोजागरी पौर्णिमेला घडलेली हि एक कथा-

शिवाजी महाराज यांनी रामदास स्वामी यांना आपले गुरु मानले होते. वेळोवेळी महाराज राजकारणा विषयी चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी रामदास स्वामींची भेट घेत असत. मधल्या काळामध्ये मोगल, पोर्तुगीज तसेच शेजारील काही शत्रू यांचा त्रास वाढला होता. महाराज स्वामींची भेट घेण्यासाठी निघाले. शिवथर घळीत पहुचले तर रामदास स्वामी आपल्या काही शिष्यांबरोबर बसले होते. स्वामींनी सर्व शिष्यांना प्रश्न केला, “को जागरती”.  त्यावर  सर्व शिष्य गोंधळले. त्यांना उत्तर काय द्यावे हे काळे ना. परंतु तितक्यातच हजर झालेल्या शिवरायांनी “अहम जागरती” असे उत्तर दिले. त्यावर रामदास स्वामी खूष झाले.

“को जागरती” म्हणजे कोण जागे आहे. आजू बाजूला संकटे असताना त्याचा सामना करण्यासाठी कोण दक्ष आहे? स्वराज्याचा प्रदेश फार थोडा होता. आजू बाजूला शत्रू होते. अशा वेळी शिवाजी महाराजांनी दक्ष/जागृत असणे खूप गरजेचे होते. त्याच बरोबर चातुर्याने सगळ्यांचं सामना करणे हा संदेश स्वामींना द्यायचा होता. म्हणून त्यांनी महाराजांना कायम चातुर्याने जागृत राहण्याचे सूचित केले. तो दिवस होता कोजागरी पौर्णिमेचा.

तर मग चला येत्या कोजागरी पौर्णिमेला गच्चीवर भेटूया.