“संक्रांत”- सूर्योपासनेचा सण

मकर संक्रांत हा सण आपल्या देशात अनेक राज्यात साजरा केला जातो. तो वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे. पंजाब मध्ये लोहरी, तामिळनाडू मध्ये पोंगल, आसाम बंगाल मध्ये बिहू.

सूर्याचा मकर राशी मध्ये स्थलांतर होत असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात याला मकर संक्रांत म्हंटले जाते. मकर संक्रांतीचा काळ तसा हिवाळ्याचा. या काळात दिवस लहान तर रात्र मोठी असते. परंतु मकर संक्रांति नंतर सूर्याची किरणे तिरकी पडण्यास सुरुवात होते. दिवस तीळा-तीळाने मोठा होत जातो तर रात्र लहान होत जाते. थंडीची तीव्रताही कमी व्हायला लागते.

मकर संक्रांती बरोबरच या दिवसाच्या आधीच्या दिवसालाही महत्व आहे. तो दिवस म्हणजे “भोगीचा”. या दिवशी घरातील सर्व मुली, स्त्रियांनी डोक्यावरून न्हाऊन घ्यावे असे सांगितले जाते. पंचभेळी भाजी केली जाते. त्यात घेवड्याला विशेष महत्व आहे. त्याच बरोबर बाजरीची भाकरी तीळ लावून केली जाते. असे वातावरणातील गारव्याला साजेसे उष्ण प्रवृत्तीचे जेवण. या दिवसात सर्वत्र भाज्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. बाजार भाज्यांनी फुलांनी सजलेला दिसतो. हवेतील गारवा सोसण्यासाठी बाजरीची उष्ण भाकरी खाऊन समतोल राखला जातो.

दुसरा दिवस संक्रांतीचा. या दिवशी हिंदू संस्कृतीच्या बहुसंख्य समाजामध्ये सुवासिनी “सुगड” पूजन करतात. सुगड म्हणजे छोटी-छोटी मडकी. आपल्या प्रथे प्रमाणे असे सुगड आणून, ते धुवून सजवले जाते. त्या-त्या मौसमात पिकणारी फळे जसे की, बोरे, ऊस, ओला हरभरा, गाजर त्यास बरोबर तिळगूड असे सर्व घालून सुगड भरले जाते. त्याची पूजा केली जाते व संध्याकाळी इतर सुवासिनीनां बोलावून त्यांना ते वाण दिले जाते. प्रत्येकाच्या प्रथे-परंपरे प्रमाणे सुगड पूजन केले जाते. “सुगड” असे प्रतीत करते की मनाची घडण ही “सु” म्हणजे चांगली केली पाहिजे. त्यात जसे आपण सर्व सात्विक पदार्थ ठेवतो, तसे आपले मन हि सद्विचारी असावे. म्हणजे घरातील वातावरण आपोआपच प्रसन्न होते.

संक्रांतीच्या दिवशी घर घरात पुरणपोळीचे किंवा गूळ-पोळीचे किंवा काहीतरी गोड-धोडाचे बेत केले जातात. नवीन लग्न झालेल्या नववधूचे हलव्याचे दागिने घालून कोड-कौतुक केले जाते. सुवासिनींच वाण देऊन हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम केला जातो.

लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते. या कालावधीत सहज उपलब्ध होणारी बोरे, हरभरा, भुईमुगाच्या शेंगा, साखरफुटाणे या सर्वांचे मिळून बाळाला बोरन्हाण केले जाते. यातून असे प्रतीत होते की बाळाची भविष्यात प्रगती होवो. त्याला कशाचीच कमी पडू नये. मोठ्यांचे शुभाशीर्वाद या निम्मिताने लहान बाळास मिळतात तर बच्चेकंपनी खाऊ लुटल्यामुळे खुश होतात.

या सगळ्यातून गारव्यामुळे वातावरण प्रसंन्न होते, त्याला साजेसे सणवार साजरे होत असतात हे सिद्ध होते. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ उष्ण प्रवृत्तीचे आहे. जे की शरीराला ऊर्जा मिळवून देतात. पूर्वी बाहेरून दमून-थकून आल्यावर गुळपाणी पुढे करण्याची पद्धत होती. त्यातून शरीरास आलेला थकवा दूर केला जातो. तीळ आणि गूळ यांचे मिश्रण शरीराला बळकटी देते. या दिवशी एकमेकाला तीळ-गुळ देऊन “तीळ-गूळ घ्या गोड-गोड बोला” अश्या शुभेच्छा दिल्या जातात. मनातील कटुता द्वेष बाजूला ठेवून या दिवशी सद्भावना जागृत केली जाते.

संक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान केली जातात. काळा रंग उष्णता ग्रहण करत असल्या मुळे थंडीपासून रक्षण होते. हे यामागचे कारण आहे.

त्याच बरोबर या दिवसात पतंग उडवण्याच्या शर्यती लागतात. गुजरातमध्ये तर पतंग महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. त्या साठी विदेशी पाहुणेही शर्यतीमध्ये भाग घेतात. अशा खेळ्यांमुळे निसर्गाशी माणसाची जवळीक निर्माण होते. सूर्याच्या किरणांचा दाह कमी असल्यामुळे या काळात सूर्यकडून मिळणारी ऊर्जा आपल्याला उपभोगता येते. थंडीमध्ये सूर्याचे ऊनही सुखद भासते. अशा प्रकारे, सणवार हे निसर्गाशी मिळते-जुळते आणि निसर्गचा विचार करून साजरे केले जातात.

संक्रांती नंतरचा पुढचा दिवस म्हणजे किंक्रांतिचा. हा दिवस करीदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तिखटाचे बेत केले जातात. अशा प्रकारे संक्रांतीचा सण तीन दिवस साजरा केला जातो.

तीळ-गूळ घ्या गोड-गोड बोला